नाशिक महापालिका निवडणुकीचे बिगुल; राष्ट्रवादीची भाजपसोबत युतीसाठी धडपड..

नाशिक महापालिका निवडणुकीचे बिगुल; राष्ट्रवादीची भाजपसोबत युतीसाठी धडपड..

नाशिक: राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. येत्या १५ जानेवारीला मतदान होणार असून १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिकसह राज्यातील सर्व २९ महापालिकांसाठी निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले असून, निवडणूक रणधुमाळीला सुरुवात झाली आहे.

नाशिकमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपसोबत युती करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भाजपसोबत युती व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आग्रही असल्याचं दिसून येत आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची हतबलता दाखवणारा व्हिडीओही समोर आला आहे.

नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हॉटेल रॅडिसन ब्ल्यू येथे भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला भाजप आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी महापालिका निवडणुकीतील उमेदवारी आणि तयारीवर चर्चा करण्यात आली.

दरम्यान, भाजपची बैठक सुरू असतानाच जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हॉटेल रॅडिसन ब्ल्यू येथे गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करण्यासाठी पोहोचले. मंत्री नरहरी झिरवळ, आमदार हिरामण खोसकर आणि माजी खासदार समीर भुजबळ हे महाजन यांच्या भेटीसाठी थांबले होते. “चर्चेसाठी पाच मिनिटं तरी वेळ द्या,” अशी विनंती मंत्री नरहरी झिरवळ आणि आमदार हिरामण खोसकर यांनी केली. दोघेही नेते महाजन यांच्या कारच्या खिडकीतून त्यांच्याशी संवाद साधत होते, आर्जवं करत होते. मात्र, कोणतीही चर्चा न करता महाजन मुंबईला रवाना झाले, त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची हतबलता स्पष्टपणे दिसून आली.

दुसरीकडे, नाशिक महापालिकेत ठाकरे बंधूंची युती होणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे एकत्र निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे. या युतीची औपचारिक घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.

या संदर्भात हालचालींना वेग आला असून, नाशिकच्या मनसे कार्यालयात मनसे आणि शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत जागावाटपावर चर्चा करण्यात आली. बैठकीला शिवसेना (उबाठा) चे जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी आणि मनसेचे नेते दिनकर पाटील उपस्थित होते.