एबी फॉर्म गोंधळाचा भाजपला फटका; नाशिकमध्ये उमेदवारीवरून मोठा पेच
नाशिक महापालिकेच्या उमेदवारी अर्जांच्या अखेरच्या दिवशी एबी फॉर्म वाटपावरून झालेल्या गोंधळाचे साइड इफेक्ट आता भाजपला जाणवू लागले आहेत.
सिडकोतील प्रभाग क्रमांक २५ मध्ये भाजपकडून चार जणांना एबी फॉर्म देण्यात आले होते. मात्र अर्ज आधी दाखल झाल्यामुळे उद्धवसेनेतून भाजपमध्ये आलेले सुधाकर बडगुजर, त्यांची पत्नी हर्षा बडगुजर आणि मुलगा दीपक बडगुजर हे अधिकृत उमेदवार ठरले आहेत.
मुंबई–आग्रा रोडवरील एका फार्महाऊसमध्ये एबी फॉर्म वाटप सुरू असताना काही कार्यकर्त्यांनी ताबा घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर आमदार सीमा हिरे यांनी तेथे धाव घेतली. यावेळी मोठा गोंधळ, तोडफोड आणि वाहनांचा सिनेस्टाइल पाठलाग झाल्याची चर्चा आहे.या प्रकरणानंतर आमदार सीमा हिरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली असून, प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी होणार असल्याचे सांगण्यात येते.
छाननीदरम्यान समोर आले की दीपक बडगुजर यांचे प्रभाग २५ आणि २९ – दोन्ही ठिकाणचे अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे ते एका प्रभागातून माघार घेतल्यास दुसऱ्या जागेवर भाजपचे अधिकृत चिन्ह उपलब्ध राहणार नाही. त्या ठिकाणी पक्षाला अपक्ष किंवा पुरस्कृत उमेदवार उभा करावा लागणार आहे.
एबी फॉर्म वाटपातील या गोंधळामुळे भाजपची मोठी नामुष्की झाली असून, अंतर्गत वाद उघडपणे समोर आले आहेत. येत्या काही दिवसांत या प्रकरणामुळे नाशिकमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


Shinde_Rupali 




