नाशिक महापालिका निवडणूक: भाजपकडे इच्छुकांची मांदियाळी; १२२ जागांसाठी हजार अर्जांचा पाऊस!

नाशिक महापालिका निवडणूक: भाजपकडे इच्छुकांची मांदियाळी; १२२ जागांसाठी हजार अर्जांचा पाऊस!

नाशिक: आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात (भाजप) उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. शहरातील १२२ जागांसाठी तब्बल एक हजार इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. एका जागेसाठी सरासरी दहा जण रांगेत असल्याने, ही गर्दी सध्या पक्षासाठी आनंदाची बाब वाटत असली तरी, तिकीट वाटपाच्या वेळी हीच परिस्थिती भाजपसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

एका जागेवर दहा दावेदार नाशिक महापालिकेत सध्या भाजपचे वर्चस्व असल्याने आणि सत्तेचा कल भाजपच्या बाजूने असल्याने इच्छुकांचा ओघ वाढला आहे. गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकांचा विचार करता, १२२ जागांसाठी साधारणपणे ७०० ते ७५० उमेदवार रिंगणात असतात. मात्र, एकट्या भाजपकडेच हजार अर्ज आल्याने, ‘एका अनार, सौ बिमार’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.

महायुतीत वितुष्ट येणार? एकीकडे राज्य पातळीवर भाजप आणि शिंदे गट एकत्रित निवडणूक लढवणार असल्याचे चित्र असताना, नाशिकमध्ये मात्र वेगळीच स्थिती आहे. भाजपच्या स्थानिक सुकाणू समितीने स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली असून, किमान १०० जागा लढवण्याचा संकल्प केला आहे. जर भाजपने १०० जागा स्वतःकडे ठेवल्या, तर शिंदे गटासाठी केवळ २२ जागा उरणार का? आणि शिंदे गट हे मान्य करणार का? हा मोठा प्रश्न आहे. या समीकरणात अजित पवार गटाचा विचार अद्याप स्पष्ट झालेला नाही.

बंडखोरीची टांगती तलवार भाजपमध्ये सध्या आयारामांची संख्या मोठी आहे. तिकीट न मिळाल्यास हे नाराज उमेदवार शिंदे सेना, अजित पवार गट किंवा ठाकरे गट आणि मनसेचा रस्ता धरू शकतात. त्यामुळे भाजपमधील ही अति-गर्दी महायुतीसाठी आणि खुद्द भाजपसाठीच आत्मघातकी ठरू शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे. मूळ निष्ठावंत कार्यकर्ते आणि नव्याने पक्षात आलेले इच्छुक यांच्यातील संघर्ष भविष्यात पक्षाला भारी पडू शकतो.

विरोधकांची रणनीती काय? सध्या विरोधकांचे वातावरण काहीसे विस्कळीत दिसत असले तरी, भाजपला रोखण्यासाठी ‘नाशिक पॅटर्न’ राबवला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. माजी खासदार  यांनी मांडलेल्या संकल्पनेनुसार, शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि मनसे अशी मोट बांधल्यास भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहू शकते.

थोडक्यात, भाजपकडे असलेली ही ‘इनकमिंग’ची लाट विजयाची नांदी आहे की बंडखोरीची ठिणगी, हे तिकीट वाटपानंतरच स्पष्ट होईल.

बातमी देण्यासाठी आम्हाला व्हाट्सअँप करा ८६६९४५६११५