मतदार जनजागृती अभियानांतर्गत ५१०० अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ.
नाशिक | नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने मतदार जनजागृती अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने आयुक्त तथा प्रशासक श्रीमती मनिषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणासाठी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना नाशिक महानगरपालिकेच्या वतीने मतदान जनजागृती व निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेची शपथ देण्यात आली.
या वेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी तसेच निवडणूक प्रक्रिया मुक्त, निष्पक्ष व पारदर्शकपणे पार पाडण्याची सामूहिक शपथ घेतली. सदर शपथेचे वाचन नाशिक महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी केले.
आज मतदान प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या केंद्राध्यक्ष, तसेच अधिकारी क्रमांक १, २ व ३ यांच्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन दादासाहेब गायकवाड सभागृह, कालिदास कला मंदिर व पंचवटी येथील सदाशिव भोरे नाट्यगृह येथे करण्यात आले होते. या प्रशिक्षण सत्रांमध्ये सकाळ व दुपार सत्रात सह जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे, उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ व अभिजीत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकारी-कर्मचाऱ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रशिक्षणाचे नियोजन तहसीलदार रामजी राठोड, सुनीता जराड व पंकज पवार यांनी केले होते. नाशिक महानगरपालिकेच्या वतीने उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर,अजित निकात, नितीन पवार यांनी संपूर्ण प्रशिक्षण सत्रांचे समन्वय व नियोजन केले.
प्रशिक्षणादरम्यान उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी,
“आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू, मुक्त, निष्पक्ष व शांततापूर्ण निवडणुकांचे पावित्र्य राखू तसेच प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे, कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता, धर्म-वंश-जात-भाषा आदींच्या प्रभावाखाली न येता मतदान करू,”
अशी प्रतिज्ञा घेत “जय हिंद, जय भारत” असा जयघोष केला.
या प्रसंगी जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी सदर प्रतिज्ञेचे अनुकरण प्रत्येक भारतीय नागरिक व प्रत्येक मतदाराने करावे, असे आवाहन केले. तसेच मतदार जनजागृती अभियान अधिक व्यापक करण्यासाठी सर्व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून अशी प्रतिज्ञा घेण्यात यावी, असे आवाहन उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना करण्यात आले.
नाशिक महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेले हे मतदार जनजागृती अभियान नाशिक महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेसाठी एक महत्त्वाचे व सकारात्मक पाऊल असून, आगामी सार्वत्रिक निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नागरिकांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण करण्यास निश्चितच उपयुक्त ठरणार आहे असा विश्वास स्विप नोडल तथा शिक्षण अधिकारी डॉ मिता चौधरी यांनी व्यक्त केला.


Nmc_nagarsevak 




