Municipal Election 2026 : राजकारण किती अनिश्चित असतं याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला
राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नसतो, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. कालच ठाकरे बंधू एकत्र आल्याच्या आनंदात जो नेता नाचत होता, पेढे वाटत होता, त्याने अवघ्या काही तासांत मनसेला रामराम ठोकत थेट भाजपमध्ये प्रवेश केला. राज ठाकरेंनी ज्याच्यावर विश्वास टाकला, ज्याला मान-सन्मान आणि जबाबदाऱ्या दिल्या, त्याच नेत्याने दगाबाजी केल्याचं चित्र समोर आलं आहे.
राजकारणात “कायमचा मित्र नसतो, कायमचा शत्रू नसतो” ही म्हण काल अक्षरशः खरी ठरली. बुधवारी मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती जाहीर झाल्यानंतर जल्लोष करणारे, पेढे वाटणारे दिनकर पाटील यांनी दुसऱ्याच दिवशी भाजपमध्ये प्रवेश करून सर्वांनाच धक्का दिला. हा प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
राज ठाकरेंनी ज्यांच्यावर विश्वास टाकला, ज्यांना पक्षात मान, पद आणि अधिकार दिले, त्या नेत्याने अचानक पक्ष सोडणं हे मनसेसाठी धक्कादायक ठरलं आहे. यावरून राजकारणात विचारधारा, तत्व आणि निष्ठा ही सोयीप्रमाणे बदलली जातात, हेच पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.
दिनकर पाटील हे मनसेमधील मोठे नेते म्हणून ओळखले जात होते. त्यांचा राजकीय इतिहास पाहिला तर पक्षांतराचा जुना अनुभव आहे. मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी भाजप सोडून मनसेमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांना नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
दिनकर पाटील हे नाशिकमधील महत्त्वाकांक्षी राजकीय नेते म्हणून ओळखले जातात. मागील वर्षी लोकसभा निवडणुकीसाठी ते भाजपकडून तिकीट मिळवण्याच्या प्रयत्नात होते. मात्र ही जागा शिंदे गटाच्या शिवसेनेला देण्यात आल्यानंतर ते भाजपवर नाराज झाले होते. त्यानंतर त्यांनी मनसेत प्रवेश करत विधानसभा निवडणूक लढवली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.


Shinde_Rupali 




